Sunday 11 December 2022

रुजवात : खारीचा वाटा

नासिक वेध 2022 नुकताच राधासह अनुभवला. समाजासाठी किती आणि काय काय करतात तरुण !! गरीब, दिव्यांग, अनाथ यांची परिस्थिती पाहता असे वाटते,  आभाळच फाटले आहे, कुठे कुठे ठिगळ लावणार ! मोठ्या संस्था,व्यक्ती त्यांच्या त्यांच्या परीने कार्य करतच आहेतच! पण आपल्याही मुलांनाही परिस्थिती बदलावविशी वाटते ! "आई, मी काय मदत करू शकते ?" असे प्रश्न तेही विचारतात ! म्हणून मनात विचार आला, उचलू देत त्यांना, त्यांचाही खारीचा वाटा !! 

त्यांच्या वयाला, इच्छेला साजेसे समाजकार्य त्यांनाही करता यावे, म्हणून त्यांना हे खारीचा वाटा चे व्यासपीठ उपलब्ध करून देऊयात असा विचार मनात आला आणि मुलांद्वारेच चालविल्या जाणाऱ्या या संकल्पनेचा जन्म झाला.  

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या IPH वेध गीताचे शब्द आहेत:  "हेतूविना प्रयास, दिशेविना प्रवास, ओटूविना तो उणा प्रत्यक्ष श्वास" !! आणि म्हणून मुलांच्या या खारीच्या वाट्याला काय हेतू आणि दिशा असावी हे स्पष्ट असावे असे वाटले. तिच्याशी चर्चा  करून दोन मूळ हेतू  अथवा उद्देश्य ठरविले १) गरजूंची मदत आणि २) पर्यावरण रक्षण !! 

लागेल ती मदत, मार्गदर्शन गरज पडेल तेव्हा पालक म्हणून करूयात ! विशेष धन्यवाद कु. आयेशा लिमये हिचे, जिने संकल्पना आवडल्यावर लगोलग, सुबकसा आणि साजेसा लोगो यासाठी तयार करून दिला. त्यात, हातात चिखल घेऊन भगवंताला मदत करणारी छोटुकली खार आहे जी आजूबाजूस दिसणारी परिस्थती पाहून, स्वयंप्रेरणेनेच मदतीसाठी तयार झाली !! आपल्या छोट्या खारींची मनेही अशीच संवेदनशील राहोत आणि त्याच स्वयंप्रेरणेने त्यांच्याही हातून चांगले कार्य घडो !!         


खारीचा वाटा उचलण्यासाठी तुमचेही स्वागत आहे !  आमचा whastaap ग्रुप जिथे सर्व उपक्रमांची माहिती, आवाहन असते , तो जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वापरा : https://chat.whatsapp.com/Lk73anpEzhHCkcvL1nwutE



1 comment: